Homeमहाराष्ट्रअंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार

मुंबई : अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन रुग्णालयाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे तसेच उपचार सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करून आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे.

रुग्णालयात सध्या पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट नसल्यामुळे हृदयविकार उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सर्जनची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अँजिओग्राम मशिनच्या साहाय्याने अँजिओग्राफीसारख्या सेवा सुरू आहेत. भविष्यात या सेवांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय कॅन्सर उपचारांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR