पाथरी : अंशत:अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १ जानेवारी २०२४ पासून विना अट २०२३ व २०२४ संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रत्येक वर्षी टप्पा लागू करावा या व अन्य मागण्याकरिता २२ जुलै पासून तहसील कार्यालय पाथरी समोर शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्याने दि.२४ रोजी शिक्षकांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास दि.२५ जुलै रोजी ढालेगाव येथील बंधा-यात अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.
सदर शिक्षकांच्या अन्नत्याग आंदोलनाचे नेतृत्व प्रा.दिपक कुलकर्णी, प्रा.रविकांत जोजारे, ज्ञानेश चव्हाण, गजानन खैरे करत आहेत. यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक शिक्षकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील शिक्षक आमदारांचा नोंदवला निषेध
महाराष्ट्रातील शिक्षकांचे मोठे आंदोलन पाथरी येथे सुरू असताना शासनाच्या वतीने कोणत्याही मोठ्या नेत्याने तसेच महाराष्ट्रातील एकाही शिक्षक आमदारांनी आंदोलन स्थळाला भेट दिलेली नाही. यावेळी आंदोलनकर्त्यांच्यावतीने बोंबा मारून शिक्षक आमदारांचा निषेध करण्यात आला. यानंतर तरी शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का? पहावे लागेल.