22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रअकोटमध्ये आघाडीतून एमआयएम बाहेर

अकोटमध्ये आघाडीतून एमआयएम बाहेर

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
अंबरनाथ आणि अकोटमध्ये भाजपाने काँग्रेस आणि एआयएमआयएम पक्षांशी आघाडी केल्याचे समोर आले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील या आघाडीला वरिष्ठ पातळीवरून विरोध होत आहे.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी आघाडी मोडण्याचे आदेश दिलेले असतानाच आता एआयएमआयएमनेही भाजपाबरोबर जाणार नसल्याचे सांगितले आहे. एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अकोटमध्ये भाजपाच्या कोणत्याही गटात एआयएमआयएम सामिल नसणार, असे ठणकावून सांगितले आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, अकोटमध्ये शहराच्या विकासासाठी अकोट विकास आघाडी स्थापण्यात आली. या आघाडीमध्ये अकोटमधील सर्वच राजकीय पक्ष सामील आहेत. शिवसेना, वंचित, प्रहार, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष या आघाडीत आहेत. त्यामुळे एआयएमआयएमलाही तिथे बोलावण्यात आले. पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जाणार नसल्याचे निक्षूण सांगितले आहे.

आघाडीतून बाहेर पडल्याचे लिखित देणार

‘‘आम्ही आतापर्यंत भाजपाविरोधात राजकारण केले. त्यामुळे या तत्त्वाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिका-यांना संबंधित आघाडीतून बाहेर पडत असल्याचे लेखी द्यायला सांगितले आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर बसणार नाही. ज्या पक्षाने या देशात जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, त्यासोबत आम्ही बसणार नाही. आमच्या पाचही कॉन्सलरना आदेश दिले आहेत. लिखितमध्ये द्यायला सांगितले आहे. महाराष्ट्रात आम्ही कुठेही, कोणतीही आघाडी होऊद्या, आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही’’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असदुद्दीन ओवेसी यांचीही नाराजी
विदर्भाची सर्व जबाबदारी युसुफ अन्सारी यांना दिली आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. पण इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याअगोदर त्यांनी वरिष्ठांशी बोलायला हवे होते. त्यांच्याकडूनही आम्ही लिखित मागवले आहे. तसेच, असदुद्दीन ओवेसीही रागवले आहेत, त्यांनीही भाजपाबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे जलील म्हणाले. विकासाचा मुद्दा आमच्यासाठी दुय्यम, पण आम्ही भाजपाबरोबर जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR