अकोला : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला महापालिकेत एकूण ८० जागा आहेत. बहुमतासाठी ४१ चा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या दोन अपक्ष, शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेत. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत. भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे ते पुतणे आहेत.
आपल्यावर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने अन्याय केल्याचा आरोप आशिष पवित्रकार यांनी केला आहे. आपला काही दोष नसताना पक्षाने निलंबित केले. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने निलंबन मागे घेण्यासह तिकिट देण्याचे आदेश दिले खरे, मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्याला जाणीवपूर्वक तिकिटापासून डावलले, असा आरोप देखील त्यांनी केला. त्यांचा रोख स्थानिक आमदार रणधीर सावरकर आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर आहे. या सर्व परिस्थितीत आपण लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत पवित्रकार यांनी दिले..
अकोला महापालिका सत्तेसाठी भाजपचे गणित
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ३८ जागा जिंकल्या आणि अकोल्यात सर्वांत मोठा पक्ष बनला. तर तिकडे काँग्रेसने १३ जागांवरून यावेळी २१ जागा जिंकत दुसरा मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवला आहे. दोन्ही पक्षांनी सत्तेचे समीकरण बसविण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचे २१ नगरसेवक विजयी झाले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा, शरद पवार गटाचे ३, वंचित बहुजन आघाडीचे ५, एमआयएम पक्षाचे ३ यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकासह आशिष पवित्रकार यांच्यासह प्रभाग ७ मधील अपक्ष नगरसेवक सोबत घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. हा आकडा ४१ होतो आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना काँग्रेसकडून मोठ्या पदाची ऑफर देऊन त्यांना आपल्याकडे घेत ४१ चा आकडा गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

