जिंतूर : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि शिक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचावा या उद्देशाने दि. २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण परभणी जिल्ह्यात अक्षर आनंद अभ्यास सहल सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या सायकल परिक्रमेची कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे उत्साहात सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेखा राठोड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर राठोड उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक तथा वाचनदूत विनोद शेंडगे यांनी विद्यार्थिनींना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. पुस्तकांच्या वाचनातून ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य भोंबे यांनी मुलांनी मोबाईलशी कट्टी करून पुस्तकाशी गट्टी करावी. तसेच जास्तीत जास्त पुस्तक वाचणारे विद्यार्थिनींचे ११वी पासून शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात पंडित दाभाडे यांनी सायकल परिक्रमेची उद्दिष्टे व चार दिवसांच्या प्रवासाची माहिती दिली. सूत्रसंचालन वाचन चळवळ समन्वयक प्रकाश डूबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जाकोरे यांनी केले. या समारोपीय कार्यक्रमाला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या सायकल परिक्रमेच्या माध्यमातून जिल्हाभर वाचन संस्कृती आणि शैक्षणिक जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
















