लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेने तिस-याही दिवशी शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली. दि. २५ जुन रोजी औसा रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्यात आली. १० ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून नालीवरीलही अतिक्रमणे काढण्यात आली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त श्रीमती मानसी यांनी पदभार घेतल्यानंतर शहराचा आढावा घेण्याचे काम सुरु केले आहे. शहरातील फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने पादचा-यांना ये-जा करणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेवून आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम दि. २३ जूनपासून सुरु झाली. पहिल्या दिवशी महात्मा गांधी चौक ते गंज गोलाई, दुस-या दिवशी भूसार लाईन, कापड लाईन आणि तिस-या दिवशी औसा रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आली. पहिल्या दिवशी ४०, दुस-या दिवशी ३० तर तिस-या दिवशी १० अतिक्रमणे काढण्यात आली.
महाननगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभाग प्रमुख रवि कांबळे, क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांच्यासह महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे कर्मचारी, गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, त्यांचे पोलीस कर्मचार, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी व एक आरसीपीची तुकडी, असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. बुधवारी औसा रोडवरील फुुटपाथवरील व नालीवरील अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईत मनपाचे अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख रवि कांबळे, क्षेत्रीय अधिकारी संतोष लाडलापूरे, छाया पवार व कर्मचारी सहभागी झाले होते.