मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांनी महिला आयपीएस अधिका-यांशी केलेल्या कठोर भाषेतील संभाषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ‘कुर्डु प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी अंजना कृणा यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पण, त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.’ असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे.
‘कुर्डु प्रकरणात अजित पवारांचा फक्त हिंदी भाषेमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून देखील जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल मित्रपक्षाकडून सुरू आहे असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.ह्याक्षातील दोन आणि तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांकडून सध्या राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाला साजेशी भूमिका घेतली जात आहे. स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या केल्या जात आहे असे आरोप त्यांनी यावेळी केले आहेत. पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे आमदार सोबत असून देखील अजित पवारांचे सर्वकाही आलबेल आहे असे नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतक-यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील असे रोहित पवार पुढे म्हणाले आहेत.
















