लातूर : प्रतिनिधी
अजितदादांच्या अपघातील निधनाने संपुर्ण महाराष्ट्र हळहळत असताना लातूर शहरातही अजितदादांच्या आठवणी ताज्या झाल्या. अजितदादा यांचा लातूरशी ऋणानूबंध होता. ते नेहमी लातूरला यायचे. त्यांचे लातूरशी आपूलकीचे नाते होते. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेसाठी अजितदादा दि. ९ जानेवारी २०२६ रोजी लातूरला आले होते. त्यांची डॉ. आंबेडकर पार्कवर सभा झाली. अजितदादांची ती सभा लातूरची शेवटची ठरली.
या सभेत अजितदादांनी आता लातूरच्या विकासाची जबाबदारी माझी, अशा शब्द दिला होता. समस्या सोडवण्याचा शब्द मी तुम्हाला देतो. मी कामाचा माणूस आहे आणि शब्दाचा पक्काही आहे. पिंपरी चिंचवड प्रमाणे लातूरचा चेहरा- मोहरा बदलू. मराठवाड्यातही आधुनिक शहरे असावीत हे माझे स्वप्न आहे. लातूरला समृद्ध वारसा आणि मोठी बाजारपेठ आहे. अलिकडे काही तरी घडणा घडली. माझ्या वाचण्यात आली. लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू, असं म्हणून गेले.
परंतु, मी आपल्याला सांगतो मी त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलय. त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांचं काम मला माहित आहे. देशमुखसाहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येत नाही आणि त्यामुळे कोणी असं पुसून टाकू शकत नाही. अरे आपली मराठी संस्कृती आहे. स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांचा वारसा आपल्याला मिळाला. वसंतदादासाहेबांचा वारसा मिळाला पवारसाहेबांची आपल्याला शिकवण आहे. आदराने बोलाना. आदराने बोलायला काय पैसे पडतात. इथे यायचं त्यांच्याच भागातल्या सुपूत्राबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे हा महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, अशा शब्दात अजितदादा यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख न करता खडसावले. त्या सभेतील दादांच्या शब्दन्शब्दांला अजितदादा यांच्या अकाली जाण्याने उजाळा मिळाला.

