24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रअजितदादांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव, आळणी : संजय राऊत

अजितदादांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव, आळणी : संजय राऊत

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी) विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्रावर आणि राजकीय क्षेत्रावर तसेच पक्षकार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भावूक होत आदरांजली व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अजितदादांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव आणि आळणी होईल. आजचा दिवस म्हणजे सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे, या शब्दांत राऊत यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली.

अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र दु:खात आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ते मुख्यमंत्री झाले असते तर ते राज्याचे उत्तम आणि कार्यक्षम मुख्यमंत्री ठरले असते, असे संजय राऊत म्हणाले. आज, त्यांच्या विमान अपघाताची बातमी कळल्यावर अजितदादा सुरक्षित असोत, अशीच प्रार्थना केली होती. तरीही दुर्दैवाने ही धक्कादायक दु:खद बातमी कानावर आली. ते दिलखुलास, रोखठोक तसेच कार्यकर्त्यांना हवेहवेसे वाटणारे नेते होते. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरील पकड सर्वांच्याच लक्षात राहील. म्हणूनच अजित पवारांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव आणि आळणी होईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अजित पवार बारामतीचे असल्यामुळे त्यांचे बारामतीचे एक नाते होते. त्याच बारामतीमध्ये त्यांचा मृत्यू व्हावा हा विचित्र योगायोग आहे. त्यांना श्रद्धांजली वाहायला लागेल, असे कधी वाटले नव्हते. ते अत्यंत कार्यक्षम मंत्री होते. त्यांना मिळालेले प्रत्येक पद त्यांनी जनता, कार्यकर्ते, विकासासाठी वापरले. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे ते मंत्री होते, राज्याच्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास पक्का होता असे उद्धव ठाकरे म्हणायचे, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

ते कधीही चिडले किंवा राग आला तरी एखादे विनोदी वक्तव्य करून वातावरण हलकंफुलकं करत असत, असे राऊत म्हणाले.
शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं आणि त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारण सुरू केलं. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल, असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते, या शब्दांत संजय राऊत यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR