बारामती : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवारांचा अपघात की घातपात याची योग्य चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज (गुरुवार) अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार हे देखील आता रोहित पवारांसोबत आले आहेत. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
अजित पवार हे व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या विमानाने उड्डाण करत होते त्या कंपनीच्या विरोधात पवार बंधू आक्रमक झाले आहेत. ‘व्हीएसआर’विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बारामती पोलिस ठाण्यामध्ये रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार आणि अनेक कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे भीषण विमान अपघात मृत्यू झाला. विमान अपघात प्रकरणी सीआयडीला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगवेळी अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या नेहमीच्या गाडीने प्रवास करून बारामतीला जाणार होते, ऐनवेळी एका खासदाराने त्यांना फोन करून व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास भाग पाडले. विमान उड्डाणाची मुख्य जबाबदारी असलेले दोन कॅप्टन यांना ड्युटी लावण्यात आली होती, ते दोघेही वाहतूककोंडीत अडकले आणि विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. त्या दोन्ही वैमानिकांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच व्हीएसआरला युरोपात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भारतात व्हीएसआरची कोणतीही नोंदणी नसताना या कंपनीला विमान उड्डाणाची परवानगी कशी काय, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

