28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्र अजित पवारांचा होणार नाही दशक्रिया विधी

 अजित पवारांचा होणार नाही दशक्रिया विधी

बारामती :प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पारंपरिक धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या विधींमध्ये ३० जानेवारी हा दिवस निर्णायक ठरल्याचे त्यांनी सांगितले. २९जानेवारीला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुस-याच दिवशी अस्थी सावडण्याचा कार्यक्रम झाला. त्याच दिवशी सोनगाव येथे क-हा-नीरा संगमावर अस्थी विसर्जन करण्यात आले. याच वेळी आवश्यक असलेले सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढे दशक्रिया किंवा तेरावा अशा कोणत्याही वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

परंपरेनुसार मृत्यूनंतर दहाव्या किंवा तेराव्या दिवशी होणा-या विधींची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कुटुंबीयांनी अस्थी विसर्जनावेळीच सर्व धार्मिक कृत्ये पूर्ण केल्याने अशा विधींची आवश्यकता उरलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे ६ फेब्रुवारीला अपेक्षित असलेला दशक्रिया विधी किंवा त्यानंतर तेरावा असा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही, हे स्पष्ट झाले. या निर्णयाबाबत अजित पवारांच्या निकटवर्तीयांपैकी कोणीही अद्याप स्वतंत्र प्रतिक्रिया दिलेली नाही.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली, तरी श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती जाहीर केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धार्मिक विधींवर पडदा पडला असला तरी कुटुंबीयांकडून येणा-या सांत्वनपर भेटींची मालिका मात्र सुरू आहे. आज काटेवाडी येथील ‘सहयोग’ निवासस्थानी पवार कुटुंबीय सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत.

सुनेत्रा पवार यांनी ३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्या पुन्हा बारामतीत परतल्या. मंगळवारी त्या काटेवाडी येथे उपस्थित राहणार असून दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनासाठी येणा-यांना भेटणार आहेत. सकाळपासूनच काटेवाडीत नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR