बारामती : प्रतिनिधी
अन्त्यसंस्कारानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात सकाळी हा विधी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: उपस्थित होते. त्यांनी अजित पवारांच्या अस्थींचे दर्शन घेतले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, गुरुवारी दुपारी बारामतीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दुपारी १२ वाजता हा अन्त्यविधी पार पडला. शासकीय इतमामात बंदुकीच्या सलामीसह त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्याने राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अन्त्यसंस्कारावेळी उपस्थित असलेले वातावरण अत्यंत भावनिक होते.
अन्त्यसंस्काराच्या वेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायक होता. कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आणि राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने यापूर्वीच अपघातस्थळी जाऊन आवश्यक नमुने गोळा केले असून, ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने केला जाणार आहे.
सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, सदर विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी पहिल्यांदा बारामती विमानतळाच्या संपर्कात आले होते. एटीसीकडून वैमानिकांना त्या वेळी वा-याचा वेग कमी असून दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पायलटने आपण रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे कळवले. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला सांगितले.
यानंतर पायलटने रनवे दिसू लागल्यावर कळवतो असे सांगितले. सकाळी ८.४३ वाजता रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णत: सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले. एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिका-याने ही माहिती दिली असून, त्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
फॉरेन्सिक तपासातून उलगडा
या अपघातामुळे संपूर्ण राज्य हादरले असून, अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेल्या दु:खात आता या दुर्घटनेच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीआयडी चौकशी आणि फॉरेन्सिक तपासातून नेमकी दुर्घटना कशी घडली, यात कोणती त्रुटी होती का, याचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बारामती आणि राज्यभरात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

