25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeधाराशिवअणदूरजवळ अपघात, ३ ठार, १२ जखमी

अणदूरजवळ अपघात, ३ ठार, १२ जखमी

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला
सोलापूर/अणदूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ६५ वर नॅशनल ढाब्याशेजारी शनिवारी (दि. २२) दुपारी १२ च्या सुमारास क्रुझरचे (एमएच २४ व्ही ४९४८) टायर फुटून झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. ही क्रुझर गाडी उळे कासेगाव येथून बोरामणी मार्गे अणदूर व नळदुर्ग येथील मैलारपूर श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी जात होती. त्यावेळी भीषण अपघात झाला.

या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमींना नळदुर्ग येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की, प्रवासी रस्त्याच्या कडेला ३० ते ४० फूट अंतरावर जाऊन पडले आणि गाडीचा चक्काचूर झाला.

या गाडीमधील ३ प्रवासी जागीच ठार झाले तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीनही महिला आहेत. रस्त्यावर पलटी झालेल्या क्रुझरला अणदूर येथील स्थानिक युवकांनी मदत केली. गाडीला सरळ करून काही जखमींना सुखरूप बाहेर काढले. यात अनेकांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ रुग्णालयात हलविले. जखमी पैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक असून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव उळे येथील असून ते अणदूर, मैलारपूर येथील श्री खंडोबाच्या देवदर्शनासाठी जात होते.

मृतांमध्ये पूजा हरी शिंदे (३०,उळे), सोनाली माऊली कदम (२२, हडपसर, पुणे), साक्षी बडे (१९, हडपसर, पुणे) यांचा समावेश आहे तर रुद्र हरी शिंदे (१२), आकाश दत्ता कदम (२५), हरी बाळकृष्ण शिंदे (३६), माऊली कदम (३०), अंजली रविंद्र आमराळे (१५), ओमकार हरी शिंदे (१०), श्लोक हरी शिंदे (८), बालाजी पांडुरंग शिंदे (४७), शिवांश माऊली कदम (१वर्ष), कार्तिक रविंद्र आमराळे (१३), कार्तिकी रविंद्र आमराळे (१५), कुणाल भिसे (३२) अशी जखमींची नावे आहेत. ही सर्व जण नातेवाईक असून, ते एकत्र देवदर्शनासाठी जात होते, पण श्री खंडोबाच्या नगरीतच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR