साहित्य मानवी जीवनाचा आरसा आहे. त्यामुळे साहित्यात प्रतिबिंबित होणारे मानवी जीवन शुद्ध, निखळ आणि संस्कारित स्वरूपाचे आढळायचे असेल तर माणूस परिवर्तनवादी होणे महत्त्वाचे आहे. हा परिवर्तनवाद निसर्गातील होणा-या बदलासहित, माणसातील होणा-या बदलांचा विकास करतो. माणूस प्रतिबिंबित झालेल्या साहित्यातून प्रेरणाही घेतो. अण्णा भाऊंनी महापुरुषांच्या विचारातून आणि स्वत:च्या वाटेला आलेल्या जगण्यातून परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवरचा पुरोगामी विचार साहित्यातून मांडला. प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याची मुभा असावी. जर माणूस स्वतंत्रपणे विचार करणार नाही तर त्याचे जीवन गुलामीचे ठरेल. माणूस हा माणूसच आहे, या माणसाने इतरांचे माणूसपण अबाधित ठेवावे. माणसाने आपल्या कर्तृत्वाने आपले माणूसपण सतत फुलवीत ठेवावे. स्वत:चे माणूसपण फुलविताना इतरांच्या माणूसपणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. हाच आंबेडकरवाद आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वाची अंमलबजावणी करणे हाच आंबेडकरवादाचा विचार आहे.
समतावादी, जीवनवादी, निसर्गवादी, मानवतावादी, विज्ञाननिष्ठ, चिकित्सक आणि आशावादी दृष्टिकोन हाच आंबेडकरवादी विचार आहे. मानवी मूल्याची जपणूक करणे, मानवी मूल्यांचा स्वीकार करणे, हाच आंबेडकरवाद आहे. मानवधर्माचा पुरस्कार करणे, मानवता म्हणजेच आंबेडकरवाद. परिवर्तनवाद म्हणजेच आंबेडकरवाद आहे. हाच विचार अण्णा भाऊंनी आपल्या साहित्य प्रतिमेतून मांडला. ‘फकिरा’ ही कादंबरी अण्णा भाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. अण्णा भाऊ लिहितात ‘जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव.’ अण्णा भाऊ जग बदलण्याची भाषा करतात. संघर्षाच्या पायावरच यशोगाथेची निर्मिती होते. कुठलेही यश हे सहजासहजी गवसत नाही. त्यामध्ये जिद्द, मेहनत असते. प्रेरणा, प्रोत्साहन असते. स्वप्न या शब्दांची बांधून ठेवलेली खूणगाठ असते. अण्णा भाऊंचा साहित्य प्रवास याच पर्वातून घडला आहे. अण्णा भाऊ म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा असून, मला माणसं आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर आढळ विश्वास आहे. हा देश समृद्ध व्हावा, सुखी व्हावा, इथे समानता नांदावी, या भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्नं पडतात.. आणि मी लिहितो.
अनिष्ट रूढी-परंपरेतून धर्माच्या आचरणाने माणसाला हीन समजणे, स्त्रियांना हीन समजणे, हा धर्म नसून तो एक रोग आहे. जात हे वास्तव आहे. गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे, असे प्रतिपादन अण्णा भाऊंनी केले आहे. अण्णा भाऊंनी स्त्रीला ‘स्त्री’ म्हणून नाही तर माणूस म्हणून रेखाटले आहे. त्यांच्या साहित्यातील काही नायिका समाज संकेतानुसार कुलीन क्षेत्रातल्या नाहीत, तरीही त्या वाचकांच्या मते अत्यंत श्रेष्ठ आणि प्रेरणादायी ठरतात. बंदिस्त आकाशामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारी स्त्री त्यांच्या साहित्यातील नायिका आजही जागोजागी आपल्याला दिसतील.
माणसाला दु:ख देणा-या घटना या निसर्गापेक्षा माणसांकडून अधिक घडतात. माणसाने माणसाला कनिष्ठ लेखणे यामध्ये माणसाचे अवमूल्यन होते. वर्णभेदाच्या पार्श्वभूमीवर जातीच्या आधारावर आणि संपत्तीच्या आधारावर माणसांची झालेली अवहेलना अण्णा भाऊ मान्य करत नाहीत, त्यास विरोध करतात. अत्यंत तरल, हळुवार, विलक्षण प्रेम कथा आणि शोकांतिका, तिचा शेवट वाचकाला गलबलून सोडतो. मनाला अस्वस्थ करून सोडतो. आशय मांडणी, वैयक्तिक आयुष्य, कोंडमारा, भावनिक गुंतागुंत यातून आलेले भयावह अनुभव, महिलांची घुसमट, तिचे दु:ख, सामाजिक दडपण, स्त्री-पुरुष नात्याचा घेतलेला वेध हा मर्मभेदी ठरतो.
कर्तव्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाची कहाणी, खटकेबाज संवाद असे मानवी स्वभावाचे विविध पैलू अण्णा भाऊंनी मांडले आहेत, रेखाटले आहेत. साहित्यनिर्मिती बरोबरच समाजाला आदर्श जीवनपद्धती देण्याचा प्रयत्न अण्णा भाऊंनी केला आहे. मानवता हा गुण त्यांच्या अंतर्मनात होता. केवळ त्यांनी तो लिहिला नाही तर तो आपल्या कृतीतून जागवला होता. अण्णा भाऊंच्या काही कथा महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सावळा मांग, सापळा, प्रायशित्त, गु-हाळ, तमाशा या कथा या ठिकाणी विचारात घेता येतील. त्याचबरोबर ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘डोळे मोडीत राधा चाले’, ‘पाझर’ या कादंब-या, ‘बंगालची हाक’ हा पोवाडा मानवतावादाचे दर्शन घडवतात.
परिवर्तन हे अण्णा भाऊंच्या लेखनाचे बलस्थान आहे. अण्णा भाऊंचे लेखन हे परिवर्तनाचा जागर करणारे लेखन आहे. त्यांच्या लेखणीतील परिवर्तनाचा जागर भारताबाहेरही गेलेला आहे. अण्णा भाऊंची प्रत्येक कथा मूल्य भाव व्यक्त करते. जाती-धर्मापेक्षा माणूस मोठा आहे, त्याचे स्वाभिमानी जगणे महत्त्वाचे आहे. अण्णा भाऊंनी उभे केलेले विचार हे क्रांतिकारी आहेत. भुकेची आग जेव्हा मस्तकात जाते, तेव्हा क्रांती घडते. श्रेष्ठ-कनिष्ठ वृत्तीला, विद्रोही, विध्वंसक वृत्तीला विरोध करणारे नायक निर्माण झाले पाहिजेत. ते स्वत: जगतात, दुस-याला जगवतात. षंढ लोक बंड करत नाहीत.
संघर्षातून समृद्धीकडे असे निर्भीड विचार अण्णा भाऊ मांडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सारे संदर्भ अण्णा भाऊंच्या कथेत सापडतात. आंबेडकरवाद म्हणजे नीती. आंबेडकरवाद हा विज्ञाननिष्ठ आहे. आंबेडकरवादाने पाप, पुण्य, कर्मकांड, अंधश्रद्धा, ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म या सर्वच गोष्टीला नकार दिला आहे. मानवी देह हा आप, तेज, वायू आणि पृथ्वी या चार तत्त्वांपासून तयार होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आकाश हे तत्त्व नाकारले आहे. त्यांनी पाचवा घटक विज्ञानाला मानले आहे. आंबेडकरवाद हे विचारस्वातंत्र्याला महत्त्व देणारे तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरवाद हा समतेचे प्रतीक आहे. तो नैसर्गिक समतेवर आधारलेला आहे. माणसामाणसाची बेरीज करणारा विचार आहे. आंबेडकरवाद हे समतेचे तत्त्व आहे.
आंबेडकरवाद म्हणजे विश्व आणि माणूस यांचे संबंध, व्यक्ती आणि समाज यांचे संबंध, आंबेडकरवाद म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही तर ती अन्यायाविरुद्ध दिलेली बंडखोर प्रतिक्रिया होय. आंबेडकरवाद म्हणजे क्रांतिकारी तत्त्वज्ञान, आंबेडकरवादाला इतर विचारांच्या कुबड्या लावण्याची गरज नाही, तर सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी तत्त्वज्ञानाची परिभाषा यालाच आंबेडकरवाद असे म्हणता येईल. निसर्गात कुठलीही गोष्ट साचून राहिली की दूषित होते. प्रवाहीपणा व बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जाती संस्था, कुटुंब संस्था, विवाह संस्था, समाजातील रूढी-परंपरा गतकाळानुसार जशाच्या तशा आहेत. त्या आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. ते या सर्व संस्थांमध्ये रूढी-परंपरांचे बदल करून त्यांना बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित व काळानुरूप करण्याची गरज आहे. तुम्ही किती अंतर चालत गेलात, त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानप्रकाशात आपल्याला नवीन समाज घडवायचा आहे.
-सुधाताई कांबळे, लातूर
मोबा. : ९५८८६ ४९७८०