आतापर्यंत ७ हजार ५०० कोटींच्या वितरणास मान्यता
मराठवाडा वगळता इतर जिल्ह्यांचा समावेश
२३ जिल्ह्यांना मिळणार मदत
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतक-यांना तातडीने मदत व्हावी, या उद्देशाने २३ जिल्ह्यांतील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतक-यांच्या मदतीसाठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी शनिवारी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.
मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले जात आहे. मागील ७ दिवसांत सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले असून यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सुमारे ७ हजार ५०० कोटीची मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपद्ग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल, असा विश्वास मंत्री जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील २३ जिल्ह्यांतील शेतक-यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. वितरीत करण्यात येणा-या मदतीत नागपूर महसूल विभागातील ३ लाख ७६ हजार ९६८ शेतक-यांच्या ३ लाख ४४ हजार ६२९.३४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३४० कोटी ९० लाख ८ हजार निधीचा समावेश आहे. यासोबतच चंद्रपूर, वर्धा, भंडारा, अकोला, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, जळगाव, नंदूरबार धुळे या जिल्ह्यांतील शेतक-यांनाही मदतनिधी मंजूर केला. तसेच पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही मदत निधीही आज मंजूर केला.
सोलापूरला ७७२ कोटी
३६ लाख रुपये मंजूर
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पुराच्या तडाख्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सिना नदी ओव्हरफ्लो झाल्याने नजीकच्या शेतशिवार आणि गावांना पाण्याने वेढा घातला होता. त्यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ५९२ शेतक-यांच्या पाच लाख ३८ हजार ८८९.५४ हेक्टर क्षेत्रासाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

