लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात २८ आणि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे १९८ किलो मिटरचे ११६ रस्ते, लहान, मोठे १०४ पुलांची मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने एकत्रीत आढावा घेतला असता रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी जवळपास ७८ कोटी ४८ लाख रूपये लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर्षी जिल्हयात मान्सून सुरू होण्यापासून ते २८ आणि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मुसळधार, अतिवृष्टीच्या पावसामुळे नद्या, ओढयांना पूर आल्याने अनेक पुलावरून किंवा नाल्यावरून पाणी वाहिल्याने रस्त्याची वाहतूक परिवहन विभागाला बंद करावी लागली. या पावसामुळे जिल्हयातील रस्ते, पुलांचेही मोठया प्रमाणात हाल होऊन नुकसान झाले. सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. लातूर जिल्हयातील ग्रामीण भागाला जोडणा-या ८८ रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच इतर जिल्हा मार्गाला जोडणा-या २८ मार्गाचे अशा प्रकारे ११६ रस्त्यांचे १९८.४० किलोमिटर रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
अनेक रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. तसेच जिल्हयातील १०४ पुलांचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. या रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी ७८ कोटी ४८ लाख रूपये लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसा अहवाल तयार करून लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.हा प्रस्ताव लवकरच होणा-या जिल्हा नियोजन समितीत ठेवला जाण्याची शक्यता आहे.
















