धाराशिव : प्रतिनिधी
सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील अल्पभूधारक असलेल्या तरुण शेतक-याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठे आभाळ कोसळले आहे.
सलग दोन आठवडे राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे. पुराच्या पाण्यात संसार वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. कर्ज घेऊन शेतीत पिकांची लागवड केली. मात्र पावसामुळे सर्वच उध्वस्त झाले असल्याने शेतक-यांच्या हातात शून्य उत्पादन आहे. यामुळे शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत.
दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे (वय ३७) या अल्पभूधारक शेतक-याने नैराशेतून मध्यरात्री शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सतत पडणारा पाऊस अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांच्या शेत नदीच्या जवळच असल्याने ३ तीन एकर सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे कर्ज कसे फेडायचे या नैराशेतून शेतामधील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे

