लातूर : प्रतिनिधी
येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानद्वारा संचलित विवेकानंद कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरबाधित रुग्णांसाठी न्यूक्लिअर मेडिसिन आणि पीईटी सिटीस्कॅन ही अद्यावत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा प्रकारची सुविधा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर लातूरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, वैद्यकीय संचालक डॉ. अरुणा देवधर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या अद्यावत सुविधेमुळे कॅन्सरचे अचूक निदान करणे शक्य होते. रुग्णाच्या संपूर्ण शरीराचा एकाच वेळी अभ्यास करून शरीराच्या संपूर्ण भागाचे सविस्तर मूल्यांकन करणे शक्य होते. तसेच कॅन्सर संबंधित रुग्णाच्या शरीरात किती प्रमाणात पसरला आहे, याचीही माहिती मिळते. या यंत्रणेमुळे रुग्णावरील उपचाराचा अचूक निर्णय घेण्यास मोलाची मदत होते. थोडक्यात, कॅन्सरबाधित रुग्णाला कमी वेळात आणि कमी त्रासात आपल्या आजाराचे अचूक निदान समजून घेता येते. आज विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही अमुलाग्र बदल झाले असून अद्यावत उपचार यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत. या अद्यावत उपचार सुविधेमुळे कॅन्सरबाधित रुग्णाला नेमकी कोणती उपचार पद्धती कशा प्रकारे लागू पडू शकते, याचीही माहिती तज्ज्ञ डॉक्टरांना वेळेत मिळते. विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. अनिल अंधोरीकर यांनी सांगितले की, विवेकानंद कॅन्सर अॅण्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, एम.आय.डी.सी. लातूर येथे कर्करोग चिकित्सा व उपचारातील सर्वोच्च उपकरणे ‘ढएळ-उळ रूंल्ल व ॠअटटअ उअटएफअ’ (रढएउळ छअइ) ही दोन अत्यंत उच्च दर्जाची उपकरणे, आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रस्थापित केली आहेत. ही यंत्रणा वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
विवेकानंद प्रतिष्ठानच्या वैद्यकीय संचालक डॉ. अरुणा देवधर यांनी विवेकानंद रुग्णालयाने परंपरेनुसार रुग्णांसाठी आवश्यक अशी अद्ययावत सुविधा लातूरमध्ये उपलब्ध केली आहे. त्यामुळे रुग्णांचा शारीरिक, मानसिक आणि वेळेचा ताण कमी झाला आहे व उपचाराची गतीही वाढणार आहे. सुमारे १३ कोटी रुपयांची ही अद्ययावत उपकरणे उपलब्ध करण्यासाठी केंद्र व राज्यशासनाने केलेल्या मदतीसोबतच त्यासाठी आवश्यक अशी विशेष दर्जाची इमारत व संरचना उभी करण्यासाठी संस्थेने मोठी गुंतवणूक केली आहे.
सध्या विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी आणि गुरुवारी पूर्वनोंदणी करणा-या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास रुग्णांच्या संख्येवरून ही सुविधा एक दिवसाआड किंवा दररोजची सुरु करता येईल. यावेळी कॅन्सर सर्जन डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. प्रमोद टिके, डॉ. योगेश सातमवार, प्रशासकीय अधिकारी डॉ. गौरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
















