दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी पुरावेच नाहीत
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अनिल परब यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात जमीन हडप केल्याचा आणि शासनाच्या सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे अनिल परब यांना दिलासा मिळाला.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे असलेल्या साई रिसॉर्टशी संबंधित प्रकरणात आरोपींवर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा, तसेच खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचे निरीक्षण नोंदवत पुराव्यांच्या आधारे सर्व आरोप सिद्ध होत नाहीत, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवत न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. त्यानंतर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण बाहेर काढणारे आणि न्यायालयात दावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
आरोपपत्रात नावच नाही
विशेष म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र सादर केले, तेव्हा माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेखही त्यात नव्हता. ज्याप्रमाणे आरोप केले, त्याप्रमाणे तपासात परब यांचा सहभाग आढळला नाही. त्यातच आता न्यायालयानेही अनिल परब यांची निर्दोष मुक्तता केली.
किरीट सोमय्या शांत, प्रतिक्रिया टाळली
आमदार अनिल परब यांची रिसॉर्ट प्रकरणी आज पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. याबाबत किरीट सोमय्या यांना विचारणा केली असता सोमय्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता बोलणे टाळले.

