31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरअन्नधान्यात देश स्वयंपूर्ण, आता ‘पोषण सुरक्षा’ हेच खरे आव्हान

अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण, आता ‘पोषण सुरक्षा’ हेच खरे आव्हान

लातूर : प्रतिनिधी
१९६०-७० च्या दशकात अन्नटंचाईशी झुंजणा-या भारताने आज अन्नधान्य उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. देशात अन्नाची रास वाढली असली, तरी त्यातील ‘सत्त्व’ म्हणजेच पौष्टिकता टिकवणे आणि देशाची ‘पोषण सुरक्षा’ बळकट करणे हेच कृषी आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रापुढील आताचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने ‘वनस्पती ऊतक संवर्धन: आव्हाने, उपाय व भविष्यकालीन संधी’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद एज्युकेशन सोसायटीचे अकॅडमिक डेव्हलपमेंट ऑफिसर डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. जे. ए. अंगुलवार, सूक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ. आर. ए. मोरे आणि जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. ए.ए.बिडकर यांची उपस्थिती होती.
देशाच्या कृषी प्रवासाचा आढावा घेताना डॉ. धवन म्हणाले की, कृषी विद्यापीठे आणि आयसीएआरच्या अथक संशोधनामुळे आपण आज अन्न अधिशेष देश बनलो आहोत. कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्न पुरवणे हे याचेच द्योतक आहे. मात्र, केवळ पोट भरणे पुरेसे नसून, शरीराच्या पोषणाची गरज भागवणे भविष्यात महत्त्वाचे ठरेल. यासाठी जैवतंत्रज्ञानात नवनवीन संशोधनाची गरज आहे.
संस्थेचे एडिओ डॉ. दरगड म्हणाले ‘प्लँट टिश्यू कल्चर’ला जैवतंत्रज्ञानातील एक क्रांतिकारी क्षेत्र मानले आहे. हे तंत्रज्ञान केवळ रोगमुक्त आणि अधिक पौष्टिक पिके विकसित करण्यासाठीच नव्हे, तर लुप्त होणा-या वनस्पतींच्या प्रजाती वाचवण्यासाठीही वरदान आहे. कमी वेळेत उच्च दर्जाचे उत्पादन देण्याची क्षमता असल्याने, जागतिक अन्नटंचाईवर मात करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुस-या सत्रात मार्गदर्शन करताना डॉ. राहुल चव्हाण यांनी ‘टिश्यू कल्चर’चे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, रोगमुक्त आणि उच्च दर्जाची रोपे तयार करण्यासाठी ही पद्धत वरदान आहे. प्रयोगशाळेतील दुषितता रोखणे आणि कुशल मनुष्यबळ तयार करणे ही या क्षेत्रातील आव्हाने असली, तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यावर मात करणे शक्य आहे.
आपल्या यशाची गाथा मांडताना उद्योजक शिवाजी सुपारे म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता शेतीपूरक उद्योगांकडे वळावे. कमी भांडवलात टिश्यू कल्चर आणि नर्सरी व्यवसाय उभारून, चिकाटीच्या जोरावर कोट्यवधींची उलाढाल करणे शक्य आहे ्कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अवंती बिडकर यांनी केले .सूत्रसंचलन पर्णवी ढवारे हिने केले. आभार प्रा. डॉ. फिरदौस बिरादार यांनी मानले. या चर्चासत्रासाठी राज्यभरातून संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR