अहमदपूर : प्रतिनिधी
अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर लांजी पाटी परिसरातील पुलाजवळ भरधाव कार पुलाच्या कठड्यास जोरदार धडकून काही क्षणांतच पेट घेतलेल्या कारमधील सहशिक्षकाचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. किनगावकडून अहमदपूरकडे एम.एच. २२ एच १९१४ क्रमांकाच्या कारने कोपदेव हिप्परगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले माधव श्रीवाड वय ५० हे येत असताना ते लांजी पाटीच्या पुढील पुलाजवळ आले असता त्यांचा वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले.
कार थेट पुलाच्या कठड्यास जोरदारपणे धडकली. धडक खुपच भीषण होती काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अपघातानंतर अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना वाहनातून बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते कारमध्येच अडकून जागीच होरपळून मृत्युमुखी पडले. आगीचे भीषण दृश्य पाहून महामार्गावरून ये-जा करणा-या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

