मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राची ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणा-या राज्य परिवहन महामंडळाला आता नव्या चेह-यांची साथ मिळणार आहे. अभिनेते रितेश विलासराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख यांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक व आकर्षक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येत्या दोन दिवसांत रितेश विलासराव देशमुख आणि जिनिलिया रितेश देशमुख यांच्यासोबत अधिकृत करार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा करार पाच वर्षांसाठी असणार असून, या काळात दोघेही एसटीच्या विविध जाहिराती, प्रचार मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतील. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांपर्यंत एसटीची सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सदर कराराचे हस्तांतरण केले जाणार आहे. यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विनंती केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर या करार हस्तांतरण कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ राखून ठेवण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
याआधीही मराठी कलाकारांची साथ
याआधी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. आता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एसटी महामंडळ नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाची चर्चा रंगली असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या काळात या जोडीला ‘लालपरी’च्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम आणि मोहिमांमध्ये पाहायला मिळणार आहे.
१ मे रोजी प्रदर्शित होणार ‘राजा शिवाजी’
‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने अभिनेते रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. या सिनेमात त्या दोघांसोबतच त्यांचा धाकटा मुलगाही सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहेत तर, या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शनही स्वत: रितेश देशमुख यांनीच केले आहे. जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमातून रितेश देशमुख यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख हादेखील सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

