सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात सुरू केलेल्या धडक मोहिमेचाच एक भाग म्हणून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली असून, यामध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या ‘आपला बाजार’ या भव्य मॉलवर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजेच शुक्रवारी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या पथकाने थेट धाड टाकून चौकशी सुरू केल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाचे पथक अचानक या मॉलमध्ये धडकले. अधिका-यांनी आत प्रवेश करताच सर्वप्रथम खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मॉलबाहेर काढले आणि मुख्य दरवाजे बंद करून कारवाईला सुरुवात केली. सध्या या पथकाकडून मॉलचे व्यवस्थापन व कर्मचा-यांची कसून चौकशी केली जात असून, अन्नपदार्थांचे परवाने, मालाचा साठा आणि इतर सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू आहे.
अवघ्या ४८ तासांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या या मॉलवर इतक्या लवकर अन्न व भेसळ विभागाला धाड का टाकावी लागली, याचीच चर्चा सध्या संपूर्ण कुडाळमध्ये रंगली आहे. उद्घाटनाची चर्चा ताजी असतानाच सरकारी पथकाने टाकलेल्या या कारवाईची बातमी शहरात वा-यासारखी पसरली, ज्यामुळे नेमके काय घडले आहे हे पाहण्यासाठी मॉलबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
चायनीज व बिर्याणी सेंटर्सवर कारवाईची मागणी
दरम्यान, एकीकडे कोकणात प्रशासनाकडून काही दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी, दुसरीकडे उघड्यावर राजरोसपणे सुरू असलेल्या चायनीज व बिर्याणी सेंटर्सकडे मात्र अधिका-यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
















