अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व अस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर दोषी आढळणा-यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला.
रुग्णालयातील घटनेची माहिती देताना बावनकुळे म्हणाले, आग लागल्यानंतर रुग्णालयातील परिचारिका, सुरक्षा रक्षक आणि कर्मचा-यांनी धावपळ करून ३६ बालकांना सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या बालकांची प्रकृती आता स्थिर असून ती नॉर्मल ऑक्सिजनवर आहेत.
घटना घडल्यापासून मी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेशी सतत संपर्कात होतो. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ‘एम्स’मधील तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि अग्निशामक अधिका-यांची उच्चस्तरीय समिती तपास करत आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कोणीही दोषी आढळल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल.
रुग्णालयाचे फायर ऑडिट, विजेचे थेट कनेक्शन, हाफकिनमार्फत पुरवण्यात आलेली यंत्रसामग्री व व्हेंटिलेटर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका या सर्वांची स्वतंत्र चौकशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून सुरू करण्यात आली आहे.
















