13.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमिरातीच्या विमानावर हल्ला; सुदानमध्ये ४० प्रवाशी दगावले

अमिरातीच्या विमानावर हल्ला; सुदानमध्ये ४० प्रवाशी दगावले

दार्फुर : वृत्तसंस्था
सुदानच्या हवाई दलाने दार्फुर येथील न्याला विमानतळावर उतरलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) विमानावर जबर हल्ला केला असून, या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. तसेच या विमानातून प्रवास करत असलेल्या ४० प्रवाशांचा मृत्यू झाला.

सुदानमधील सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या विमानामध्ये कोलंबियाचे भाडोत्री सैनिक होते. तसेच या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला. ज्या न्याला विमानतळावर हा हल्ला करण्यात आला तो रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या ताब्यात आहे. तसेच सुदानचे लष्कर आणि आरएसएफ यांच्यामध्ये एप्रिल २०२३ पासून संघर्ष सुरू आहे.

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीचे हे विमान न्याला विमानतळावर उतरताच त्याच्यावर झालेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये पूर्णपणे नष्ट झाले आहे. हे विमान आखाती देशांमधील कुठल्यातरी विमानतळावरून उडाले होते. तसेच त्यामध्ये अनेक परदेशी सैनिक आणि आरएसएफसाठीची हत्यारे आणि उपकरणे होती, असा दावा सुदानच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे.

दरम्यान, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांनी सांगितले की, कोलंबियाचे सरकार हे या हल्ल्यात किती कोलंबियन मारले गेले याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे मृतदेह परत आणता येतील का, याची चाचपणी करत आहे. पेट्रो यांनी भाडोत्री सैनिकांच्या वापरावर बंदी घालण्याचेही संकेत दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR