भंडारा : प्रतिनिधी
गायिका अंजली भारती यांच्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत निषेध केला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. हे वक्तव्य अंजली भारती यांनी १३ जानेवारी रोजी भंडा-यात केले आहे. त्यामुळे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यावर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंडा-यात १३ जानेवारी रोजी भीम मेळावा झाला. या मेळाव्यात अंजली भारती यांनी बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचारा संदर्भात जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी वाढते बलात्कार आणि न होणारी कारवाई याबद्दल चीड व्यक्त करताना अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केले. या अत्याचाराविरोधात बोलताना अंजली भारती यांनी अमृता देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांना शिक्षा देण्यासंदर्भात अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विट केल्यामुळे प्रकाशझोतात आले आहे.
गायिका अंजली भारती भीम मेळाव्यात बोलताना बलात्कार, अत्याचाराविरोधात राग व्यक्त करत होत्या. या वादात त्यांनी विनाकारण अमृता फडणवीस यांना खेचले. अंजली भारती यांचे वक्तव्य सूडाचे असल्याची टीका होत आहे. याशिवाय त्या बरेच काही बोलल्या आहेत. जो बलात्कार करतो, त्याचं डोकं, मान कापा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जो कुणी बलात्का-याचे डोकं, मान कापून आणेल त्याला माझी अर्धी संपत्ती आणि ५० लाख रुपये देईन अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
बलात्काराला बलात्काराने उत्तर देणे चुकीचे : डॉ. नीलम गो-हे
अंजली भारती यांच्या वक्तव्याचे पडसाद आता समाजात उमटत आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे वक्तव्य १३ जानेवारीचे आहे. तरीही काहीच कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अंजली भारती यांच्या वक्तव्याने आपण अस्वस्थ झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीवर दिली आहे. बलात्काराला बलात्काराने उत्तर देऊन पीडितेला कसा न्याय मिळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ नेत्यांनी अंजली भारती यांना समज द्यावी आणि मीदेखील त्यांना बोलावून घेईन आणि समजावून सांगेन, असे आश्वासन डॉ. नीलम गो-हे यांनी दिले आहे.
किशोरी पेडणेकरांनी केला निषेध
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पत्नी अमृता फडणवीसजी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्या वक्तव्यांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून निषेध करते, अशी पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
चित्रा वाघ यांनी केली कारवाईची मागणी
आताच मी अंजली भारती यांचा एक व्हीडीओ बघितला. तळपायाची आग मस्तकात गेली, राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत गलिच्छ बोलणे ते सुद्धा एका बाईने. अंजली भारती या बाईची कीव करावी तेवढी कमी आहे. अंजली भारतीवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

