Homeअंतरराष्ट्रीयअमेरिका-इराण युद्ध थांबणार?

अमेरिका-इराण युद्ध थांबणार?

तोडग्यासाठी प्रयत्न, १ पानी सामंजस्य करारावर एकमत
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. युद्धावर कायमस्वरुपी तोडगा निघावा यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. परंतु इराणकडे असलेला युरेनियमचा साठा आणि इराणकडून सुरू असलेला अणुकार्यक्रम यावर एकमत होत नाही. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हादेखील गंभीर विषय होऊन बसला आहे. त्यातच आता दोन्ही देशांत जवळपास एकमत झाले असून एका पानाचा करारही तयार असल्याचे बोलले जात आहे. आता सर्व काही सुरळीत झाले तर युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली जाऊ शकते.

इराणसोबतचे युद्ध समाप्त करण्यासाठी तसेच अणुकार्यक्रमावर व्यापक चर्चा करण्यासाठी एक पानी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सहमत होण्याची शक्यता आहे. या करारात १४ महत्त्वाच्या तरतुदी आहेत. यावर अमेरिकेची सहमती अंतिम टप्प्यात आहे. हा सामंजस्य करार लागू झाला तर तात्काळ युद्धविराम लागू होणार आहे. हा करार अस्तित्त्वात आल्यास अमेरिका तात्काळ प्रभावाने इराणवरील निर्बंध हटवणार आहे. यासोबत अब्जावधी डॉलर किंमत असलेली इराणी मालमत्ता इराणकडे पुन्हा सुपूर्द केली जाणार आहे. दोन्ही देशांत होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी करण्यावर तसेच सागरी मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

युरेनियम संवर्धनावरील
स्थगिती वादाचा मुद्दा
इराणवरील युरेनियम संवर्धनावरील स्थगिती हाच दोन्ही देशांतील प्रमुख वादाचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. इराणच्या युरेनियम संवर्धनावर २० वर्षांची स्थगिती असावी, असे अमेरिकेला वाटते तर हा कालावधी ५ वर्षांचा असावा, अशी इराणची भूमिका आहे. आता दोन्ही देश हा कालावधी १२ ते १५ वर्षांपर्यंत करण्यास सहमती दाखवण्याची शक्यता आहे.

भारतात पेट्रोल,
डिझेलचे दर स्थिर
अमेरिका-इराण संघर्षामुळे संपूर्ण जगालाच इंधन संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीतही भारतात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ व्यावसायिक एलपीजीच्या दरातच वाढ करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR