इराण संस्कृती संपविणार, जगभरात धाकधूक वाढली
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा गंभीर इशारा देत आजची रात्र इराणसाठी काळरात्र असून इराणच्या संस्कृतीचे नामोनिशाण मिटवू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आता पश्चिम आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे.
इराणच्या बाबतीत असे काही घडावे, असे मला वाटत नाही. परंतु तसे होण्याची शक्यता आहे, ्से म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शेवटचा प्रहार करणार असल्याचे संकेत दिले. तसेच इराणमध्ये संपूर्ण सत्ताबदल होणार असल्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिले. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. आजची रात्र ही इराणसाठी काळरात्र ठरू शकते. इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आजचा क्षण हा इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण असेल असे म्हणत ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला.
आजच्या रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. मला तसे व्हावे असे वाटत नाही. पण कदाचित तसे होईल. मात्र, आता संपूर्ण सत्ताबदल झाला आणि बुद्धिमान, कमी कट्टर विचारांचे लोक सत्तेत आले तर कदाचित काही तरी क्रांतिकारी आणि अद्भूत घडू शकते. जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असेल. ४७ वर्षांची भ्रष्टाचारी, खंडणीखोर आणि मृत्यूची राजवट अखेर संपेल. इराणच्या महान जनतेवर देवाची कृपा असो, असेही ट्रम्प यांनी म्हटले.
जगभरात वाढली चिंता
ट्रम्प यांच्या निर्वाणीच्या इशा-यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच पश्चिम आशियात तणावपूर्ण परिस्थिती असताना ट्रम्प यांच्या या पोस्टने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, सत्तांतरासारखा शब्दप्रयोग हा अत्यंत संवेदनशील असून, यामुळे राजनैतिक आणि लष्करी हालचालींना वेग येऊ शकतो.
अमेरिकेच्या भारतातील
राजदूतांसोबत बैठक
अमेरिकेने इराण संस्कृतीचे नामोनिशाण मिटविण्याची धमकी दिली. परंतु या धमकीला न जुमानता इराणने आम्ही लढत राहू, अशी भूमिका घेतली. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना अमेरिकेचे भारतातील राजदूत ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेने इराणला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. इराणला दिलेली मुदत संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांची बैठक होणार आहे. एका बंद दरवाजाआड ही बैठक होणार असल्याने या बैठकीत नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आता इराणचे राष्ट्रपती
म्हणतात मरायला तयार
अमेरिकेने इराणला इशारा दिलेला असताना इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी थेट अमेरिकेला आव्हान देत या युद्धात मीही माझे प्राण द्यायला तयार आहे, असे म्हटले. आतापर्यंत अभिमानी १४ दशलक्ष इराणी नागरिकांनी या युद्धात प्राणांची आहुती देण्यासाठी नोंदणी केली आहे. मीदेखील इराणसाठी माझे प्राण देण्यासाठी तयार होतो आणि भविष्यातही राहील, असे पेझेश्कियान म्हणाले.

