वॉशिंग्टन डी.सी. : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२६ या आर्थिक वर्षासाठीच्या नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ऍक्टवर स्वाक्षरी केली आहे. या नवीन संरक्षण कायद्यामध्ये भारतासोबतचे संबंध अधिक दÞृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या कायद्यानुसार, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वॉड देशांमधील भागीदारी अधिक मजबूत केली जाणार आहे. मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारतासोबतचे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय लष्करी सराव, संरक्षण व्यापार आणि सागरी सुरक्षा वाढवण्याचे उद्दिष्ट अमेरिकेने ठेवले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील २००८ च्या ऐतिहासिक नागरी अणुऊर्जा कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एक नवीन संयुक्त सल्लागार यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. ही यंत्रणा भारताच्या देशांतर्गत अणुदायित्व नियमांना आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्यासाठी काम करेल.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले की, हा कायदा शक्तीद्वारे शांतता हे त्यांचे अजेंडा राबवण्यास मदत करेल. याद्वारे भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मित्र राष्ट्रांसोबत संरक्षण उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढवले जाईल.

