७० लाख लोक रस्त्यावर, देशातील सर्वांत मोठे आंदोलन
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे विरोधी प्रदर्शन असल्याचे म्हटले जात आहे. सुमारे २७०० ठिकाणी ७० लाखांहून अधिक लोक ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध, विशेषत: त्यांच्या ट्रान्सजेंडर विरोधी वक्तव्यांविरुद्ध आणि इतर वादग्रस्त निर्णयांविरुद्ध निदर्शने करत आहेत. अमेरिकेतील मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत सर्वत्र लोक रस्त्यावर उतरले आहेत.
या विशाल विरोध प्रदर्शनात विविध सामाजिक, राजकीय आणि नागरी गटांनी भाग घेतला आहे. महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणा-या संघटनांपासून ते पर्यावरण कार्यकर्ते आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचे विरोधक यात सहभागी झाले आहेत. जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळावर टीकास्त्र सोडले. ट्रम्प प्रशासनाविरुद्ध वाढता असंतोष आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात या विरोधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांबाबत उचललेली पावले आणि त्यांच्या कार्यकाळात घेतलेले इतर वादग्रस्त निर्णय देशभरातून तीव्र विरोधाला कारणीभूत ठरले आहेत. गर्भपाताच्या हक्कांवर निर्बंध, हवामान बदलांविरुद्धची धोरणे आणि सामाजिक असमानतेत वाढ हेही या आंदोलनातील प्रमुख मुद्दे आहेत. न्यायपालिकेत ट्रम्प यांनी नियुक्त केलेल्या न्यायाधीशांच्या निर्णयांविरुद्ध आणि संघीय पोलिसांच्या काही आक्रमक पावलांविरुद्ध अनेक संघटनांनी एकत्र येऊन हे विरोधी प्रदर्शन आयोजित केले होते.
हा तर लोकशाही संस्थांवर हल्ला
आंदोलकांनी ट्रम्प यांच्या शासन काळात लोकशाही संस्थांवर हल्ला होत आहे. याउलट प्रशासनाने या विरोधांना राजकीय षडयंत्र आणि सामाजिक असंतोष पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनाला नो किंग्स प्रोटेस्ट असे नाव देण्यात आले.

