बीड : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ऐतिहासिक नारायणगडावरील भव्य दसरा मेळाव्याच्या अवघ्या काही तास आधी बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमोल खुणे हे तुळजापूर येथून भवानी मातेची ज्योत घेऊन आपल्या मूळ गावी परतत होते. वाटेत ते बीड तालुक्यातील पाली येथील जागृत नागनाथ मंदिराच्या दर्शनासाठी थांबले असता हा थरार घडला.
खुणे मंदिरात पोहोचताच तिथे आधीपासून दबा धरून बसलेल्या ५० ते १०० अज्ञात तरुणांच्या टोळक्याने त्यांना अचानक गराडा घातला. हल्लेखोरांनी मंदिराचे मुख्य दरवाजे आतून बंद करून घेतले, जेणेकरून कोणालाही मदतीसाठी आत येता येऊ नये किंवा खुणेंना पळून जाता येऊ नये.
लाकडी दांडके, काठ्या आणि लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने टोळक्याने त्यांच्यावर तुटून पडत बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत अमोल खुणे यांच्या दोन्ही हातांना गंभीर फ्रॅक्चर आणि दुखापती झाल्या असून, शरीरावर इतरत्र मोठ्या प्रमाणावर मार लागला आहे. प्रचंड मारहाणीमुळे खुणे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील अमोल खुणे यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना खुणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधला.
“मी नारायणगडावर होणा-या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. तिथे जाऊन मी काही गोष्टी जनतेसमोर मांडणार होतो. मी त्या मेळाव्याला पोहोचूच नये, हा या हल्ल्यामागचा मुख्य कट होता.”
















