पक्षीतज्ज्ञ मारुती चित्तमपल्ली यांचे निधन
सोलापूर : प्रतिनिधी
प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ आणि वृक्ष अभ्यासक अरण्यऋषी मारूती चित्तमपली यांचे आज निधन झाले. सोलापुरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काने गौरवण्यात आले होते.
चित्तमपली यांनी पक्षीकोश, पाणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन केले आहे. त्यांनी वन्यजीव अभ्यासक म्हणून मोठे कार्य केले आहे. त्यासोबत त्यांनी मराठी भाषेसाठीही तितकेच योगदान दिले. या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र, पुरस्कार स्वीकारुन घरी आल्यापासून ते आजारी होते. दीर्घ आजारात आज सायंकाळी ७ च्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मारुती चितमपल्ली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापुरात झाला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. वन विभागात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. वन्यजीवनावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. अनेक पुस्तके लिहून त्यांनी निसर्गाची माहिती दिली. पक्षी जाय दिगंतरा आणि चकवा चांदणं यांसारख्या त्यांच्या पुस्तकांनी वाचकांचा ठाव घेतला.
मारूती चितमपल्ली यांच्या नोकरीची सुरुवात सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वन विभागात झाली. त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर, बोटा, राजूर, गोंदिया, नवेगावबांध, पनवेल आणि पुणे येथे वन विभागात काम केले. १९९० मध्ये ते निवृत्त झाले. चितमपल्ली यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात मोठे योगदान दिले.
पक्षीतज्ज्ञ म्हणून ओळख
मारुती चित्तमपल्ली एक उत्तम पक्षीतज्ज्ञ होते. त्यांनी वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी खूप संशोधन केले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले विचार मांडले. चितमपल्ली राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती आणि छत्रपती संभाजीनगरच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य होते.
अनेक पुस्तके प्रसिद्ध
मारूती चितमपल्ली यांनी अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचे देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षीशास्त्र (संस्कृत-मराठी अनुवाद), घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप (इंग्रजी-मराठी अनुवाद), पक्षीकोश, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांचे ‘चकवा चांदणं’ हे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे.