जयपूर : वृत्तसंस्था
अरवली वाचवा मोहिमेची चर्चा आता केवळ राजस्थानमध्येच नाही तर देशभरात होत आहे. रस्त्यावरील निदर्शनांपासून ते सोशल मीडियापर्यंत या मुद्याला जोर आला आहे. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी वाळू कलाकृतीद्वारे अरवली पर्वतरांगांचे जतन करण्याचा संदेश दिला. त्यांनी १०० टनाहून अधिक वाळू वापरून एक कलात्मक निर्मिती केली. या भव्य शिल्पात अरवलीला राजस्थानची जीवनरेखा म्हणून दाखवले आहे.यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगांची एक नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे. या अंतर्गत फक्त १०० मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली मानल्या जातील. जर हा निकष लागू केला गेला तर अरवली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहील. यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होऊ शकतो. याचा भूजल पातळी, हवामान संतुलन आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल. यामुळे लोकांनी रस्त्यावर येत आंदोलनाचा पवित्रा घेतला.
राजस्थानपासून दिल्ली-एनसीआर आणि गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग केवळ भौगोलिक रचना नाही तर ती उत्तर भारताच्या हवामान, पर्यावरण आणि जीवन व्यवस्थेचा कणा मानली जाते. अलिकडच्या काही महिन्यांत कायदेशीर व्याख्या, वृक्षतोडीच्या स्थानिक घटना आणि नियामक हस्तक्षेप यामुळे अरवलीच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, अरवली पर्वतरांग जैवविविधतेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. बिबटे, कोल्हे, हरण, शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आणि औषधी वनस्पती येथे आढळतात. येथील जंगले कार्बन शोषण, माती संवर्धन आणि स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करतात. ग्रामीण आणि आदिवासी समुदायांचे जीवनमानही या टेकड्यांशी थेट जोडलेले आहे. तथापि, अलिकडच्या काळात स्थानिक वृक्षतोड आणि जमीन साफ करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही भागात, बेकायदेशीर खाणकाम, बांधकाम उपक्रम आणि जमीन वापरातील बदलांमुळे वनस्पतींचे नुकसान होत आहे.
अरवली पर्वतरांगा
नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या
राजस्थानसाठी अरवली पर्वतरांगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा प्रदेश थार वाळवंट आणि पूर्व भारत यांच्यामध्ये एक नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतो. तज्ज्ञांच्या मते, अरवली पर्वतरांगांच्या उपस्थितीमुळे राजस्थानातील अनेक भाग पूर्णपणे वाळवंट होण्यापासून रोखले गेले. या टेकड्या मान्सूनच्या वा-यांचा वेग कमी करतात, ज्यामुळे पाऊस पडतो आणि भूजल पुनर्भरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
नद्यांचा अरवली
पर्वतरांगातून उगम
बनास, लुणी आणि साबरमती सारख्या नद्या अरवली पर्वतरांगेत उगम पावतात आणि वाहतात, ज्यामुळे राज्यासाठी जलसुरक्षेचा आधार मिळतो. उत्तर भारताच्या दृष्टीने पर्वतरांग थार पर्वतरांगातून येणारी धूळ आणि उष्ण वारे दिल्ली-एनसीआर आणि गंगेच्या मैदानापर्यंत पोहोचण्यापासून रोखते.
















