17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरअरविंदच्या आईची गर्जना... खबरदार

अरविंदच्या आईची गर्जना… खबरदार

लातूर : प्रतिनिधी
माझ्या काळजाचा तुकडा गेला. माझे स्वप्न उद्ध्वस्त झाले. ज्यांनी माझ्या बाळाचा बळी घेतला, त्यांना मी सोडणार नाही, ‘जेएसपीएम’ संस्था चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय अरविंदचे शव घेणार नाही, अशी गर्जना अरविंदची आई शीलाबाई खोपे यांनी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर केली. त्यांनी एकदम हंबरडा फोडला. अरविंदचे वडील राजाभाऊ यांनी पत्नी शीलाबाईच्या भूमिकेला समर्थन दिल्याने अखेर पोलिसांनी फिर्यादी सहदेव गणपती तरकसे यांचा पुरवणी जबाब घेतला आणि त्यानुसार  तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे (रा. पांगरी, ता. परळी) या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी संस्थेतच संशयास्पद मृत्यू झाला.  मुलाचा खून करण्यात आल्याचा आरोप पालक व नातेवाईकांनी केल्याने ‘जेएसपीएम’संस्थेत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. अरविंदच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी अरविंदचा मृतदेह येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारीच  आणला गेला. परंतु अरविंदचे शवविच्छेदन करण्यापूर्वी  अरविंदच्या मृतदेहाचे स्कॅनिंग करुन इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची भूमिका अरविंदचे पालक व नातेवाईकांनी घेतल्याने शवविच्छेदन बुधवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बुधवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास अरविंदच्या मृतदेहाचे स्कॅनिंग करुन इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अरविंदचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करताच अरविंदची आई शीलाबाई व वडील राजाभाऊ यांनी पुढे होत ‘जेएसपीएम’च्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल होईपर्यंत अरविंदचे शव ताब्यात घेणार नाही आणि तसा कोणी प्रयत्न केला तर खबरदार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी सहदेव गणपती तरकसे यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडून पुरवणी जबाब घेतला. तसे पत्र सहायक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांच्या स्वाक्षरीने तरकसे यांना  दिले.  तरकसे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात पोहोचले व त्यांनी पुरवणी जबाबाचे पत्र शीलाबाई व राजाभाऊ यांच्या हाती दिले. पत्राचे वाचन झाल्यानंतर अरविंदचे शव ताब्यात घेऊन सायंकाळी सर्वजण पांगरी ता. परळीकडे रवाना झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR