छगलागम : अरुणाचल प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. अंजाव जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या छगलागम परिसरात हा अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगराळ भागातील रस्त्यावरून १००० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमध्ये एकूण २२ कामगार होते. जे अरुणाचल प्रदेशात कामासाठी आले होते. या सर्व कामगारांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या कामगारांपैकी १९ जण आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुक्री टी इस्टेटमधील होते.
या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या सर्व मजुरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आहे आहे. पोलिस आणि स्थानिक नागरिक बचाव आणि मदत कार्य करत आहेत. या घटनेमुळे आसाममधील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

