लातूर : प्रतिनिधी
अर्धा पावसाळा संपला मात्र अद्याप लातूर जिल्हयातील पाणी टंचाई दूर झाली नाही. आज पर्यंत पडलेल्या पावसामुळे कांही प्रमाणात अधिग्रहणांची संख्या घटली असली तरी आज घडीला १४१ वाडया, तांडे, गावात १९१ अधिग्रणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे जिल्हयात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी दमदार पावसाची नितांत आवश्यकता आहे.
लातूर जिल्हयात मार्च पासून सुरू झालेली पाणी टंचाई अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी जिल्हयात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच नले, आढे, नद्या पूर्णपणे प्रवाहित न झाल्यामुळे सार्वजनीक पाणीपुरवठयाच्या स्त्रोतांना अद्याप पाणी आले नसल्याने खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरीकांना पाणीपुरवठा सध्या केला जात आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जुलै ते सप्टेंबर असा तीन महिण्यांसाठी १२ कोटी रूपयांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तसेच जिल्ह्यात अपु-या पर्जन्यमानामुळे निर्माण होणा-या पाणी टंचाईमध्ये आवश्यकतेनुसार खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहाच्या कालावधीस ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत किंवा पुरेसा पाऊस होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी निर्गमित केले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४१ गावे, वाड्यांमध्ये १९१ विहिरी तथा विंधन विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दुर होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व खरीप, रब्बी पिके शेतक-यांच्या पदरात पडणार आहेत.
















