परभणी : मानवत शहरातील धनगर गल्ली भागातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने सततच्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ३० सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन एका तरुणाविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मानवत शहरातील धनगर गल्ली भागातील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच भागातील संशयित आरोपी पवन मुंजाजी माने हा वारंवार त्रास देत होता. तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोलत जा असा तगादा लावून मानसिक त्रास देत होता. आरोपीने अल्पवयीन मुलीचे छायाचित्र तिच्या संमतीविना स्नॅपचॅट या सोशल मीडिया अॅपवर स्टेटसला प्रसारित केले होते. यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी होईल या भीतीने आणि मानसिक धक्क्यातून मुलीने दि. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती.
या प्रकरणी मृत मुलीचा भाऊ अमोल जयसिंग लेंगुळे याने मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून आरोपी पवन मुंजाजी माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिक्कड करत आहेत.
















