परभणी : अल्पवयीन मुलीस पळवून नेणा-या आरोपी आशिष रणखांबे (वय २०) या तरुणास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी ३ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दैठणा पोलिस ठाण्यात १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी एक तक्रार दाखल झाली होती. यात तक्रारदाराने त्यांची अज्ञान मुलगी कोणीतरी पळवून नेल्याचे म्हटले होते. या प्रकरणी तपासिक अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक ज्योती बडेगावे यांनी तपास केला. या प्रकरणी आरोपी आशिष रणखांब रा. साळापुरी यास ताब्यात घेतले. त्याने या मुलीस आमिष दाखवून नाशिकला पळवून नेले होते. ती अज्ञात आहे हे माहित असतांना सुध्दा तीच्या सोबत राहिला होता.
दरम्यान, या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात साक्षीदार तपासण्यात आले. त्यातून संबंधित आरोपीने आई-वडिलांच्या सानिध्यात असणा-या मुलीस पळवून नेल्याचे सिध्द झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सदरानी यांनी या आरोपीस वरील शिक्षा ठोठावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. त्यांना अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी सहकार्य केले. कोर्टपैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल फातेमा शेख, वंदना आदोडे, सचिन धबडगे यांनी या प्रकरणात काम पाहिले.
















