लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणा-या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.दनांक १४ मार्च २०२६ रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय १७ वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे २.०० वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी अजय दिलीप काळे, देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक १६ एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यात आली.चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे ५ ग्रॅम
वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ७५ हजार रुपये) तसेच मोटारसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

