मुंबई : प्रतिनिधी
मागच्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस, कधी उकाडा अशी स्थिती आहे. मागच्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस राज्यात धुमाकूळ घालताना दिसला. सतत पाऊस सुरू होता. गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. आता राज्यावरील अवकाळीचे संकट दूर झाले असून उन्हाचा कडाका वाढला आहे. आजही तापमानात सतत चढ-उतार बघायला मिळत आहेत.
जानेवारीमध्ये राज्यात पाऊस झाला. त्यानंतर राज्यातील थंडी गायब झाली. फेब्रुवारी महिन्यात राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसला. थंडी, पाऊस आणि उकाडा असे तिन्ही हंगाम अनुभवता आले.
राज्यात उकाडा वाढू लागला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उन्हाचा चटका अधिक तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबच्या भटिंडा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. भटिंडा येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात १२.२अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे ३६.३ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
शहरासह पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घटत असलेल्या किमान तापमानात शुक्रवारी दोन ते तीन अंशाने वाढ झाली. परिणामी पहाटेचा गारवा कमी झाला असून दिवसभरात कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. लोहगाव येथे सर्वाधिक ३५अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि गारवा असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे. दोन दिवसांपासून पहाटे जाणवणारी थंडी गायब झाली आहे.

