लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक करणा-या एका व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नाईक चौक ते कंदील चौक रोडवर पांढ-या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कूटी क्रमांक एपी २३ एजी ७७७० वर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. सदर पथकाने स्कूटी थांबवून झडती घेतली असता, अॅक्टिव्हा गाडीच्या डिक्कीमध्ये व पाय ठेवण्याच्या जागी पांढ-या पोत्यामध्ये व निळ्या बॉक्समध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा मिळून आला. झडतीदरम्यान विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थांचे विविध पुडे,असा ३६ हजारी ७०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. तसेच हा गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कूटी असा १ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शैलेश अंबादास पारसेवार (वय ५१ रा. ब्लॉक नं. १९, कनेरी रिंग रोड, साई सृष्टी रो हाऊस, देसाई नगर, लातूर) च्या विरोधात विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशन करीत आहे.

