शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
साकोळ मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्यात आल्याने अवैध पाणी उपसा होऊ नये, यासाठी प्रकल्प परिसरातील सर्व डीपींचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महसूल विभाग व महावितरणच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
साकोळ मध्यम प्रकल्पातील शेंद उत्तर, शेंद दक्षिण, शेंद पश्चिम, तळेगाव, तिपराळ, कानेगाव व साकोळ येथील डीपींचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर पाण्यातील विद्युत मोटारी काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली मात्र कारवाईदरम्यान संबंधित शेतक-यांनी आम्ही स्वत: मोटारी काढून घेतो, असे सांगत मोटारी स्वेच्छेने बाहेर काढण्यास सुरुवात केली. नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे, मंडळ अधिकारी नवनाथ खंदाडे, ग्राम महसूल अधिकारी श्यामसुंदर राजवंश,आकाश आलुरे, नितीन चिटपल्ले, दयानंद हाळे तसेच कोतवाल आणि महावितरणच्या कर्मचा-यांच्या उपस्थितीत तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.प्रकल्पातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असल्याने त्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पाणी आरक्षणाचे उल्लंघन करून उपसा केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
















