लातूर : प्रतिनिधी
शहरातील गोविंदनगर, मयुरबन कॉलनीत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पत्नी सरोजा सौदागर तांदळे यांनी मयूरबन सोसायटीतील मालमत्तेवर अनाधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारींनंतर लातूर शहर महानगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय ‘डी’च्या वतीने थेट नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरात अवैध बांधकाम करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील गोविंदनगर, मयूरबन सोसायटी येथील मालमत्ता क्र. डी १-३९९-३२ वर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या एकापाठोपाठ एक अशा ३ तक्रारी लातूर शहर महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.
अजयकुमार घोडके, सद्दाम एकबाल सय्यद आणि वैजनाथ देशमुख यांनी या बांधकामाविरोधात लातूर मनपाकडे रीतसर तक्रारी अर्ज दाखल केले होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत लातूर शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी सरोजा सौदागर तांदळे यांना नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये बांधकामाशी संबंधित सर्व अधिकृत कागदपत्रे १४ दिवसांच्या आत क्षेत्रीय कार्यालयात सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही मनपाने दिला आहे. एकीकडे प्रशासनात जबाबदार पदावर असणा-या तहसीलदारांच्या कुटुंबावरच अनधिकृत बांधकामाचा आरोप झाल्याने लातूर खळबळ उडाली आहे.
















