मुंबई : डीजेच्या तालावर नाचणा-या कलाकारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता कलाकारांना आपण करत असलेल्या नृत्यप्रकारात अश् लील बाबी नसल्याबाबतच प्रमाणपत्र राज्य सरकारच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून घ्यावं लागणार आहे. राज्यात कार्यक्रम करत असताना सदर प्रमाणपत्र आयोजकांच्या माध्यमातून पोलिसांना सादर केल्यानंतरच कार्यक्रमाला परवानगी मिळणार आहे. महाराष्ट्रातील लावणी आणि लोककलेच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील ‘डीजे लावणी’ला आता लगाम लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सरकारकडून शासन आदेश काढण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी होणा-या लावणी, तमाशा, लोकनाट्य, लोकसंगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संहिता किंवा निवेदनाची तपासणी करून Suitability Certificatel घेणं आवश्यक करण्यात आलंय. यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, सांस्कृतिक विभागाकडून सार्वजनिक मंडळांना कार्यक्रमाची परवानगी देताना सदर प्रमाणपत्राची पडताळणी करूनच परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. लावणीचा कार्यक्रम असेल तर डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य वाजवणे बंधनकारक असल्याचे सांस्कृतिक विभागाकडून निर्देश देण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या पारंपरिक लावणी आणि लोककलेच्या नावाखाली अश्लील कार्यक्रम सादर केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने शासनाकडे कारवाईची मागणी केली होती. राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले आहेत.
















