लातूर : प्रतिनिधी
शांत, सुरक्षित आणि सुसंस्कृत लातूर असंस्कृत राजकारण स्विकारत नाही हे येथील जनतेने महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे, असे नमूद करून या निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीला विक्रमी ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांचे जाहीर आभार मानले. लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने ७० पैकी ४७ जागा जिंकून ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर, शुक्रवारी दुपारी दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी शहरातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांना अभिवादन केले, त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला, सायंकाळी सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे एकत्र झाले असता माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या जल्लोषातत सहभागी होऊन सर्वांचे अभिनंदन केले लातूरकरांचे जाहीर आभार मानले.
याप्रसंगी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंखे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. किरण जाधव, सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील शांत, सुरक्षित, विकसित शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये महानगरपालिका निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांनी व पदाधिका-यांनी येथे येऊन द्वेषाचे राजकारण केले. येथील नेतृत्वाबद्दल असंस्कृत वक्तव्य केले. संपूर्ण लातूरला एक कुटुंब म्हणून सांभाळणारे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या आठवणी लातूरकरांच्या मनावर कोरलेल्या आहेत. त्या कधीही पुसणार नाहीत हे या निवडणुकीच्या निमित्ताने लातूरकरांनी दाखवून दिले आहे.
देशात आणि राज्यात एकत्र सरकारमध्ये असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाच्या नेत्यांनी कटकारस्थान करून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मताची विभागणी करण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्नही लातूरकरांनी हाणून पाडला आहे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पक्षाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीतील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
अनेक इच्छुकांनी या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरीचा मार्ग न स्वीकारता पक्षासाठी काम केले. ज्यांनी ज्यांनी पक्षासाठी या निवडणुकीत योगदान दिले त्या सर्वांसाठी पक्ष सकारात्मक विचार करून योग्य वेळी योग्य संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.

