अहमदपूर : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षकांचे दुर्लक्ष तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या डोळेझाकपणामुळे येथील बेशिस्त व मनमानी कारभार वाढल्यामुळे येथील २ महिला रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणी उपसंचालकांनी त्वरित बैठक घेऊन सखोल चौकशी करून मयताच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सम्राट मित्रमंडळाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात
आला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. घोषणाबाजी, निदर्शने आणि ठाम भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण रुग्णालयातील दिरंगाईमुळे दीपाली दयानंद वाघमारे व सिंधुताई येंमले या २ महिलांचा मृत्यू झाला असून हे मृत्यू म्हणजे थेट प्रशासनाच्या आणि डॉक्टरांच्या निष्क्रीयतेचे बळी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जबाबदार डॉक्टर, अधीक्षक व कर्मचा-यांवर तातडीने कठोर कारवाई केली नाही तर जनतेचा संताप उग्र रुप धारण करेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी रुग्णालयातील विविध गैरसोयींवर बोट ठेवले. येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिस तात्काळ बंद करावी, निधी असूनही बंद ठेवलेल्या १०२ रुग्णवाहिका तातडीने सुरू कराव्यात, ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअरमधील सर्व मंजूर पदे तत्काळ भरावीत, डायलेसिस, सोनोग्राफी, रक्त तपासणी यासह सर्व अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, उपजिल्हा रुग्णालयाचे काम तात्काळ मंजूर करावे, उपजिल्हा रुग्णालयासाठी शासकीय गायरान जमीन तातडीने हस्तांतरित करून घ्यावी आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. प्रशासनाने वेळकाढू धोरण स्वीकारल्यास आंदोलन आणखी तीव्र, व्यापक व उग्र करण्याचा स्पष्ट इशारा या वेळी देण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक संतोष गायकवाड यांनी केले. या वेळी माजी नगरसेवक वसंतराव कदम, अण्णाराव सूर्यवंशी, भगवानराव ससाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात गणेशराव माने, सम्राट मित्र मंडळाचे शहराध्यक्ष बजरंग गायकवाड, रत्नदीप परचंडेकर, किरण कांबळे, यादव सोनकांबळे, प्रदिप कांबळे, तबरेज सय्यद, सचिन बानाटे, डॉ. बालाजी थिट्टे, शरद कांबळे, आकाश पवार, विकास ससाणे, रितेश रायभोळे, सुमित वाघमारे, शिवराज गायकवाड, कमलाकर गायकवाड, अविनाश गायकवाड, सिध्दार्थ गायकवाड, शिवाजी वाघमारे, मोहन वाघमारे, राम गायकवाड, मनोहर गायकवाड, बालाजी गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड, शिवाबाई येमले, सविता तोगरे, प्रमोद येमले, मनोज येमले, धोंडिराम तोगरे, धोंडू तात्या, माधवराव तिगोटे आदी सहभागी झाले होते.

