अहमदपूर : प्रतिनिधी
शहरासह परिसरातील सर्व सात पेट्रोल पंपांवर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वेळेवर इंधन न मिळाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे तेथे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.
या सर्व पंपांवर मागील ८ दिवसांपासून अधूनमधून इंधनाची कमतरता भासत आहे. इंधन मिळेल या आशेने नागरिक आपली दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने पंपावर उभी करून तासन्तास प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, कंपन्याकडून वेळेत पुरवठा न झाल्याने अनेकांना वाहनांसह थांबून उभे राहावे लागत आहे. सोलापूर येथील डेपोमधून इंधनाचा पुरवठा वेळेवर न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. हिंदुस्थान पेट्रोलिअम, भारत पेट्रोलिअम, आणि इंडियन ऑईल यांच्या ऑईल डेपोंमधून पेट्रोल, डिझेल पुरविले जाते. या ऑईल डेपोंमधूनच या पेट्रोल पंपांना पुरेसे पेट्रोल, डिझेल दिले जात नसल्याचे समोर येत आहे. कंपन्यांना या पेट्रोल पंपांनी आगाऊ पैसे भरून, चलन घेऊनही त्यांचे टँकर भरले जात नाहीत. यामुळे पेट्रोल पंप ड्राय पडत आहेत. २६ मार्च रोजी दुपारनंतर तर सर्व पंपांवर इंधन पूर्णपणे संपल्याच्या अफवेने मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी सुप्रसिद्ध तात्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध होताच वाहनधारकांनी तेथे रात्रभर लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

