अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत मतदान प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणेच्या सक्षम नियोजनात यशस्वीरीत्या व शांततेत पार पडली. शनिवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अत्यंत शांततेत व सुरळीतपणे पूर्ण झाली. तालुक्यातील एकूण २०० मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद मतदारसंघात मतदारांनी ६५.१८ टक्के मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १,६०,६९३ (पुरुष ८३,९४६ व महिला ७६,७४७) इतकी असून, यापैकी महिला ४९,९१६ तर पुरुष ५४,८२३ अशा एकूण १,०४,७३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात सरासरी ६५.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्हा परिषद गटनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे—खंडाळी : १८,५४३ (६९.०४ टक्के), अंधोरी : १७,७५९ (७१.९१ टक्के), हाडोळती : १७,३९३ (६३.६९ टक्के), शिरूर ताजबंद : १८,३४४ (६४.३४ टक्के), किनगाव : १५,४२८ (६०.३६ टक्के), सावरगाव रोकडा : १७,२७२ (६३.८९ टक्के), तसेच पंचायत समितीच्या १२ गणांमध्ये—खंडाळी, उजना, अंधोरी, थोडगा, हाडोळती, कुमठा, शिरूर ताजबंद, वळसंगी, किनगाव, धानोरा बु., सावरगाव रोकडा व काजळ हिप्परगा—येथे मतदान प्रक्रिया कोणत्याही अनुचित प्रकाराविना सुरळीतपणे पार पडली.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली १४ पोलीस उपनिरीक्षक, २२३ पोलीस कर्मचारी, ३२६ होमगार्ड तसेच एसआरपीच्या दोन सेक्शनचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर, गट विकास अधिकारी पंकज शेळके, धनाजी सुळ, रमाकांत पट्टेवाड , नायब तहसीलदार संतोष अनर्थे, अभिलाष जगताप, मुनवर मुजावर, संजय भोसीकर, शुभांगी जवादे, अर्जुने, तलाठी अविनाश पवार, नामदेव अर्जुने ,तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व शिक्षक बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

