अहमदपूर : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणूक सोमवार, दि.२ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात, सुरळीत व शांततेत पार पडली आहे. नगराध्यक्ष पदासह एकूण २५ नगरसेवक पदांसाठी मतदारांनी लोकशाहीचा उत्सव साजरा केला. सायंकाळी ५.३० पर्यंत २६,५५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ७०.४४ टक्के मतदानाची नोंद झाली आणि शेवटी एकुण २७५४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पुरुष मतदान१४२४२ तर महिला मतदार १३२९८ असे एकूण २७५४० हजार इतके मतदान झाले असून मतदान टक्केवारी ७३.०६ टक्के आहे. नगरपरिषद क्षेत्रात एकूण ३७,६९६ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यात पुरुष : १९,२४४ महिला : १८,४५२ असे मतदार आहेत. शहरात १२ प्रभाग, त्यापैकी प्रभाग १ ते ११ मधून प्रत्येकी २ व प्रभाग १२ मधून ३ असे एकूण २५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. मतदानासाठी ४४ केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत ८.९७ टक्के ,११.३० वाजता २१.९९ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.५१ टक्के,दुपारी ३.३० पर्यंत ५३.५४ टक्के तर मतदान प्रक्रिया बंद होईपर्यंत ७३.०६ टक्के एकूण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला आणि अनेक केंद्रांवर रांगा दिसून आल्या.
सखी मतदान केंद्र विमलाबाई देशमुख विद्यालयात उघडण्यात आले होते या ठिकाणी पूर्णपणे महिला कर्मचारी होत्या. आदर्श मतदान केंद्र महात्मा गांधी महाविद्यालयात सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी उत्कृष्ट सुविधा व सजावट ,मतदारांनी या केंद्रांवर उत्साहाने मतदान केले. मतदानासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १२ पोलीस अधिकारी, १४० पोलीस कर्मचारी, १०० होमगार्ड, एसआरपीएफची एक तुकडी नियुक्ती करण्यात आली होती.

