31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रअहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायचा डाव

अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायचा डाव

मोदींनी जनतेची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमूदने उद्ध्वस्त केले त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजपा व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध केला व ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींचा ३०० वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणा-या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेच्या समोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे. अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. भाजप व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे म्हणाले, अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये वाराणसी येथे मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर १० जानेवारी रोजी भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. २७ तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवालही यशपाल भिंगे यांनी केला आहे.

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल परंतु घड्याळाशी आघाडी केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR